शक्ती कायद्यासाठी धडपड, तृतीयपंथीयांच्या आरक्षणासाठी प्रयत्न; कोण आहेत आमदार प्रतिभा धानोरकर? जाणून घ्या!

मुंबई : पती खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रमाणेच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण समाजकार्याची आवड होती. त्यामुळेच सासरी आल्यावर पतीसोबत त्यांना खंबीरपणे राजकारणात उभं राहता आलं. पण राजकारणात असूनही त्यांनी सामाजिक कार्याचा वसा सोडला नाही. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन त्या राजकारणात कार्यरत आहेत. त्यांच्या धडपडीमुळेच आज महिलांना संरक्षण देणारा शक्ती कायदा तयार होत आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा घेतलेला हा आढावा.

एकमेव महिला आमदार

प्रतिभा धानोरकर यांचा जन्म 9 जानेवारी 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. त्यांच्या माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड होती. त्यामुळे त्या गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरहिरीने पुढाकार घ्यायच्या. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून त्या शेवटच्या वर्गापर्यंत मदतीचा हात पोहोचेल या तळमळीने काम करायच्या. त्यातूनच सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांची जडणघडण झाली.

त्यांचा विवाह खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्यासोबत झाला. धानोरकर हे त्यावेळी शिवसेनेत होते. बाळू धानोरकरांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. सासरी राजकीय वातावरण असल्याने प्रतिभा धानोरकर यांनी सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यातही भाग घ्यायला सुरुवात केली. धानोरकर हे खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघात योग्य उमेदवार नसल्याने प्रतिभा यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर काँग्रेसमधून त्याला विरोध झाला. त्या सक्षम महिला उमेदवार ठरणार नाहीत, असा अनेकांचा समज होता. मात्र, योग्य उमेदवारच मिळत नसल्याने अखेर प्रतिभा यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी कटारिया भवनात प्रतिभा यांनी जोरदार भाषण केलं आणि निवडणूक जिंकण्याआधीच आपण सक्षम उमेदवार असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर त्यांनी निवडणूकही जिंकली. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील त्या एकमेव महिला आमदार आहेत.

राजकारण कशा शिकल्या?

प्रतिभा धानोरकर यांच्या माहेरी राजकीय वातावरण नव्हतं. सासरी मात्र पतीच राजकारणात असल्याने राजकीय वातावरण मिळालं. त्यांचे पती बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पतीच्या निवडणूक प्रचारातूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. या प्रचारा दरम्यानच त्या भाषण करायलाही शिकल्या आणि त्यांना लोकांच्या समस्याही समजून घेता आल्या.

तृतीयपंथीयांना आरक्षण द्या

प्रतिभा धानोरकर यांनी नेहमीच वंचित घटकासाठी काम केलं आहे. समाजातील सर्वात वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांनाही मुख्य प्रवाहात येता यावं आणि त्यांनाही सन्मानाचं जीवन जगता यावं म्हणून त्यांनी तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांना पोलीस खात्यासह इतर खात्यात दोन टक्के आरक्षण द्याव, त्यांना निवासाची व्यवस्था करावी आदी मागण्या त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केल्या होत्या. त्या केवळ मागणी करून थांबल्या नाहीत तर स्वत:च्या घरी त्यांनी तृतीयपंथीयांसोबत दिवाळी साजरी करून नवा आदर्शही घालून दिला.

शक्ती कायद्याची सर्वात प्रथम मागणी

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा होणार आहे. या कायद्याची सर्व प्रथम मागणी प्रतिभा यांनीच केली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला अत्याचार रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली होती. आता हा कायदा आकार घेत असल्याने त्यांची सर्वात महत्त्वाची मागणीही पूर्ण होताना दिसत आहे. शक्ती कायद्याची त्यांनी सर्वात आधी मागणी केली होती. त्यामुळे शक्ती कायद्यासाठीच्या समितीवर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आलं आहे. शिवाय त्या काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्य करत आहेत.

‘मदतीचा एक घास’

कोरोना काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांना अर्धपोटी उपाशी रहावं लागत आहे. तर काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी काँग्रेसच्या महिला प्रदेश काँग्रेसने ‘मदतीचा एक घास’ ही मोहीम राबवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिभा धानोरकर यांनी ही मोहीम सुरू केली. त्यांनी या मोहिमेत नुसता भाग घेतला नाही, तर स्वत: पोळ्या लाटून इतर महिलांनाही या उप्रकणात भाग घेण्यास उद्युक्त केलं. या उपक्रमांतर्गत गरजूंना घरचे जेवण दिलं जातंय. त्यासाठी महिलांनी घरी रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पावभर भाजीही जास्त करायची. हे सर्व अन्न एकत्र करून एखाद्या संस्थेला दिलं जातं किंवा महिला काँग्रेसच्या बॅनर्सखाली गरजूंना दिलं जातंय.