• ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथील घटना
चंद्रपूर : अनैतिक संबंधातून जन्मास आलेले नवजात अर्भक रात्रीच्या सुमारास कचऱ्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे गुरुवारी (24 जून) ला सकाळी उघडकीस आला आहे. नवजात बालीका असून ती जिवंत असल्याने तिला तात्काळ ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची हकीकत अशी की. आज गुरुवारी प्रहरी पाच वाजताचे सुमारास गावातील काही महिला शौचालयाकरीता बाहेर जात होत्या. त्यांना गावातील बस स्टॉप पासून माळी मोहल्या मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत कच-यात एका कापडा मध्ये गुंडाळलेले नवजात अर्भक आढळून आले. लगेच याप्रकाराची माहिती गावात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. त्यानंतर या बाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळी येवून नवजात अर्भकाची पहाणी केली असता ते जिवंत आढळून आले. लगेच त्यास ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नवजात अर्भक ही बालिका आहे. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाला रात्रीच्या सुमारास
कचऱ्यात फेकल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. एकीकडे भ्रूणहत्या हत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे अनैतिक संबंधातून जन्मास येणा-या नवजात बाळाला संपविण्याचा प्रकार मातांकडून होत असल्याने या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.