BREAKING : आशिया खंडातील सर्वात मोठ्या चिचपल्ली बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहरालगत वनविभागाच्या महत्वाकांक्षी बांबू संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरालगत मूल मार्गावर चिचपल्ली गावाजवळ हा जागतिक दर्जाचा निर्माणाधिन बांबू संशोधन आणि प्रशिक्षण प्रकल्प आहे. आज २५ फेब्रवारीला दुपारीच्या सुमारास सर्वात आधी प्रकल्पाच्या छतावर आगीचे लोळ नजरेस पडले.

त्यानंतर संपूर्ण छताला आगीच्या ज्वाळानी घेरले. आगीचे नेमके कारण मात्र अज्ञात असले तरी आसपास घनदाट जंगल असल्याने सोसाट्याचा वारा आग वाढवत आहे. चंद्रपूर मनपाची 2 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. अत्यंत सुबक आणि देखणा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. TATA TRUST चा काही भाग सामाजिक दायित्व निधी म्हणून या 91 कोटी रुपयांच्या प्रकल्पात वापरला जात असून, कित्येक संशोधन आणि प्रशिक्षण संकुलांच्या इमारती या परिसरात बांधण्यात येत आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली इमारत ही मुख्य प्रशासकीय इमारत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आसाम -सिंधुदुर्ग आणि कोलकाता भागातून आणलेल्या विशेष बांबूंद्वारे ही इमारत उभारली गेली आहे. केवळ बांबू वापरून उभारलेली ही आशियातील एकमेव इमारत असल्याने त्याचा जागतिक पातळीवर गौरव केला जात होता. इमारत निर्माणाधीन असल्याने पुढच्या काही काळात त्याचे उद्घाटन अपेक्षित होते. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती घेण्यासाठी वरिष्ठ वनाअधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आगीच्या कारणांचा तपास केला जात आहे.