वेंटीलेटर अंबुलन्स व पाण्याचे टॅंकर साठी मात्र मनपाकडे निधी नाही.
नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना खुले पत्र लिहून संताप व्यक्त केला
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेने २४ लक्ष रुपयाचे प्रसिद्धीचे काम एका एजन्सीला दिले आहे. एक वर्षासाठी दिलेल्या या कामाचा प्रति दिवस खर्च ७००० रुपये आहे. एजन्सीने १६ एप्रिल पासून सुरु केलेल्या कामाचा आढावा घेतल्यास रोज दोन पोस्टर डिझाईन करून त्या पोस्ट फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम व ट्विटर इत्यादी समाज माध्यमावर टाकण्यात येतात. समाज माध्यमावर या पोस्ट टाकण्यासाठी कोणताही वेगळा खर्च लागत नाही. बाजार भावाप्रमाणे दोन पोस्टर डिझाईनचा खर्च एकूण २०० रुपये आहे.सोबत रोज एखादी प्रेस नोट तेवढी या एजन्सीकडून लिहून घेण्यात येते. मात्र प्रसिद्धीच्या या कामासाठी मनपा वर्षाला २४ लक्ष म्हणजेच महिन्याला २ लक्ष रुपये व दिवसाला जवळपास ७ हजार रुपये एजन्सीला देत आहे.
कोविड आपत्तीमध्ये शहरा अंतर्गत दवाखान्यात बदलविण्यासाठी शहरातील रुग्णांनी २ ते ५ हजार रुपये वेंटीलेटर ॲम्बुलन्स साठी खर्च केले. नागपूर किंवा इतर ठिकाणी रुग्ण नेण्यासाठी ३० हजार रुपयांच्या जवळपास खाजगी व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स साठी अनेक रुग्णांना भुर्दंड सोसावा लागला.
अशा परिस्थितीत केवळ १९ लक्ष रुपये खर्च करून प्रस्तावित असलेली व्हेंटिलेटरयुक्त ॲम्बुलन्स निधी अभावी मनपाने मागील १ वर्षापासून खरेदी केलेले नाही. व्हेंटिलेटर ॲम्बुलन्सचा प्रस्ताव जानेवारी २०२० पासून धूळ खात पडलेला आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरने २०० ते २५० ट्रिप मारून शहरामध्ये टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. वन अकादमी व क्राईस्त हॉस्पिटलमध्ये दररोज ४० ते ५० ट्रीप टॅंकरने पाणीपुरवठा होतो. मनपाकडे असलेल्या ८ टॅंकरने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यामुळे टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दोन-दोन, तीन-तीन दिवस तसेच रात्री अपरात्री पर्यंत पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते. मे व जून या २ महिन्यासाठी अतिरिक्त ७ ते ८ टँकर भाड्याने घेतल्यास पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य आहे. यासाठी दोन महिन्यात रुपये ४ लक्ष पेक्षा कमी निधीची गरज आहे. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून मनपाने टॅंकर वाढवण्याचे टाळले आहे. त्यामुळे वेंटीलेटर ॲम्बुलन्स साठी पैसे नाही, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर साठी पैसे नाही व पाण्याचा टँकर साठी ही पैसे नाही अशी अवस्था असलेली महानगरपालिका सोशल मीडियावरच्या २ पोस्टर डिझाईन व एका प्रेस नोट साठी महिन्याला २ लाख म्हणजेच दररोज ७ हजार रुपये खर्च करत आहे. याच्या विरोधात संताप व्यक्त करणारे खुले पत्र लिहून नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आयुक्त राजेश मोहिते यांचा खरपूस समाचार घेतला.
तसेच सदर कंत्राट रद्द करून वेंटीलेटर ॲम्बुलन्स, पाण्याची टँकर अशा आवश्यक बाबीवर खर्च करावा अशी मागणीही त्यांनी केली.