चंद्रपूर : कोरोनाने मागील वर्षभरापासून कहर केला आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून चंद्रपूर शहर महानगरपालिकासुद्धा सुटलेली नाही. मालमत्ता कराची वसुली झाली नाही.
त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका घेण्यास पैसे नाही. मात्र, प्रसिद्धीसाठी महानगरपालिकेने वर्षाकाठी २४ लाखांचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. त्यामुळे हे कंत्राट तातडीने रद्द करण्यात यावे.
अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.