प्रसिद्धीचे कंत्राट देणाऱ्यांना प्रसिद्धीची भाषा शोभत नाही : रितेश (रामू) तिवारी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भजन आंदोलनावर आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर

चंद्रपूर : प्रसिद्धीसाठी वार्षिक २५ लाख रुपयांचे कंत्राट कुणी दिले हे सर्व चंद्रपूरकर जनतेला माहित आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी भजन आंदोलन करण्यात आले, असा आरोप करणे हास्यास्पद आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्त्यांच्या कामाची फाइल मागील ५ महिन्यांपासून मंजुरीसाठी प्रलंबित आहे, असे म्हणून मनपातील सत्ताधारी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ती फाइल तत्काळ मंजूर व्हावी, यासाठी कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नाही, असे प्रत्युत्तर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी काँग्रेसच्या आंदोलनांवर टीका करणाऱ्यांना दिले आहे.

चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अपघाताच्या घटना घडत आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर विरोधक म्हणून काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. या आंदोलनातून या प्रश्नांची गंभीरता सत्ताधारी, प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपातील सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी आहे असे म्हणून आपले हसे करवून घेत आहेत. कारण महापालिकेच्या इतिहासात प्रसिद्धीचे कंत्राट आजपर्यंच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी दिलेले नाही. मात्र, हा प्रताप विद्यमान भाजप सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. वर्षाकाठी २५ लाख रुपये मोजून आपला गवगवा करण्याचे काम सुरु आहे.

मार्च २०२१ मध्ये ठराव घेतला. त्यानंतर फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. मात्र, तेव्हापासून फाईल मंजुरीसाठी पडून आहे असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, फाईल मंजुरी मिळविण्यात मनपा प्रशासनाचे प्रयत्न कमी पडले असेच म्हणावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवून ते आपली जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे फाईल तत्काळ मंजूर करून शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने करावी. जेणेकरून चंद्रपूरकर जनतेला होणारा त्रास कमी होईल, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.