शासकीय सभागृह ताब्यात घेण्यासाठी झेडपीच्या हालचाली

व्यावसायिक शिकवणी सुरू असताना होते पदाधिकारी गप्प

आज सोमवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा पार पडली या सभेत घूग्घूस येथील सभागृह ताब्यात घेण्याचा ठराव घेण्यात आला

घुग्घुस : गेल्या काही वर्षांपासून येथील शासकीय इमारतीत व्यावयिक शिकवणी सुरू होती. तेव्हा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी गप्प बसून होते. आता हीच इमारत आपल्या ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेत सध्या भाजपाची सत्ता आहे. याच सत्तेचा उपयोग करून ही शासकीय इमारती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

येथील वॉर्ड क्रमांक सहा येथे शासकीय इमारतीचे काम २०१४-१५ या सत्रात करण्यात आले. त्यानंतर ही इमारत ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्षांचे भाऊ हे व्यवसायीक कराटे शिकवणी वर्गा याच इमारतीत घेत होते. घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. त्यानंतर या इमारतीतील कराटे प्रशिक्षणाला काँग्रेसने विरोध केला. ते प्रशिक्षण बंद करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत तहसीलदार निलेश गौड यांनी ही इमारत सील करून नगर परिषदेच्या ताब्यात दिली. यानंतर या इमारतीत कोरोना लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. शेकडो नागरिकांचे या इमारतीत लसीकरण झाले. ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीतून नगरपंचायतीचा कारभार सुरू आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने त्या इमारतीत काम करण्याची तयारी मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी सुरू केली. मात्र, त्या आधीच ही इमारत जिल्हा परिषदेने आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही इमारत जिल्हा परिषदच्या ताब्यात ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. गेली काही वर्ष भाजप नेत्यांनी या शासकीय इमारतीचा खासगी वापर केला. तेव्हा जिल्हा परिषदे निद्रा अवस्थेत होती. आता अचानक त्यांना जाग आली. इमारत आपल्या ताब्यात घेण्यामागे मोठा राजकीय दबाब आहे.