IDFA (International Documentary Film Festival) in the Netherlands महोत्सवासाठी चंद्रपूर येथील अक्षय इंगळेच्या डॉक्युमेंटरीची निवड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर :‘FTII’च्या शेवटच्या वर्षात फिल्म सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेत असलेल्या चंद्रपूर येथील अक्षय प्रदीप इंगळे या युवकाने लॉकडाऊनमध्ये घरी असताना केलेल्या डॉक्युमेंटरीची निवड जगातील डॉक्युमेंटरीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नेदरलँड येथील ‘इडफा’ (आंतरराष्ट्रीय माहितीपट चित्रपट महोत्सव ॲमस्टरडॅम, नेदरलँड) ‘Idfa’ (International Documentary Film Festival Amsterdam, Netherlands) या महोत्सवासाठी झाली आहे.

युवकांसाठी बनविण्यात येणाऱ्या डाॅक्युमेंटरीच्या विभागात जगातून आलेल्या तीन हजार एंट्रींमधून केवळ नऊ डाॅक्युमेंटरी निवडण्यात आल्या. त्यात भारतातून ‘महल्लेंची शाळा-फॅमिली गोइंग लाइव्ह ‘ ‘Women’s School-Family Going Live’ या एकमेव डाॅक्युमेंटरीची निवड झाली. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने सुरू असणाऱ्या शाळेसाठी इंटरनेट व इतर सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसतानाही ऑनलाइन शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी रोज गणवेश घालून मोबाइल स्क्रीनसमोर बसून दुसऱ्या वर्गात शिकणारी जानू, चौथ्या वर्गात शिकणारा वेदू, घर सांभाळत मुलांसोबत असणारी आई दीपिका व स्वतः विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणारे शिक्षक वडील उमेश या महल्ले कुटुंबावर केलेली ही निरीक्षणात्मक डाॅक्युमेंटरी आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शाळेतील ही मुले कधी अभ्यासात रमतात, तर कधी कंटाळून बालिशपणे आई-वडिलांविरुद्ध बंड पुकारतात. या घडामोडींत निर्माण होणाऱ्या घरगुती गमती-जमतीवर हा लघुचित्रपट उपहासात्मक टीका करतो.

१० लोकांमध्ये निवड

अक्षयचे वडील प्रदीप इंगळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगरमध्ये कार्यरत असल्यामुळे त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपूरमध्ये झाले. पुढे औरंगाबादला इंजिनीअरिंग करून पहिल्याच प्रयत्नात भारतातून १० लोकांमध्ये निवड होऊन त्याने एफआयआयटीमध्ये स्थान पटकावले.

एकखांबी तंबू

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये अक्षयने ही डॉक्युमेंटरी शूट केली. लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यासाठी या माहितीपटात त्याने आपल्या बहिणींच्या परिवारातील सदस्यांनाच कलावंत म्हणून घेतले. छायाकार, संकलक, दिग्दर्शन, ध्वनिमुद्रण अशा अनेक बाजू त्याने स्वत: सांभाळल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने साधनांची स्वत: जुळवाजुळव करून निर्मितीचे बरेच कार्य घरीच पूर्ण केले आहे. या माहितीपटाच्या १० मिनिटांच्या भागाची गुणवत्ता बघून त्याच्या पुढील पूर्णत्वासाठी ‘पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट’’Public Service Broadcasting Trust’ या शासकीय संस्थेने आर्थिक अनुदान दिले आहे.