गडचिरोलीत चार ट्रॅक्टर व पाणी टँकरला नक्षलवाद्यांनी जाळले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

•घटनेत जवळपास 60 लाखांचे नुकसान झाल्याचा

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी आज 26 एप्रिलला भारत बंद पुकारलेला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री अहेरी तालुक्यातील मेडापल्लीत चार ट्रॅक्टर व पाणी टँकरला नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे.

आलापल्ली पेरमिलीमध्ये मेडपल्ली पासून तुमीरकसा या गावात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी आणलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. या घटनेमुळे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावले असून त्यामध्ये पेरमिली एरीया कमेटी माओवादी असा उल्लेख केलेला आहे.

या घटनेत जवळपास 60 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नक्षलवाद्यांचा आज भारत बंद असुन काल रात्री छत्तीसगडच्या सुकमामध्येही त्यांनी जाळपोळ केली होती. या बंद दरम्यान अनेक विघातक कृत्य करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा असाच प्रयत्न असल्याचे गडचिरोली पोलीस दलाने म्हटले आहे.

जाळपोळ करण्यात आलेली वाहने कोणत्या ठेकेदाराची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी जिल्ह्यातील रस्ते कामांना नक्षलवाद्यांकडून नेहमीच विरोध होत असल्याचे पुन्हा एकदा जाळपोळ घटनेवरून स्पष्ट झाले आहे.