रामपूर मटण बाजारात विक्रीवरून उद्भवले भांडण ;  माजी नगरसेवकासह दोघे जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाऊन शिथिल होताच प्रत्येक व्यावसायिक पोटाची खळगी भरण्यासाठी आपापले दुकाने आता सुरू करू लागले असताना आज रविवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील रामपूर हद्दीतील बाजार समिती समोर असलेल्या चिकन मटण दुकानात झालेल्या वादात माजी नगरसेवक विलास जंगळुजी तुम्हाने (वय ४५) व तनिस गजानन दुर्गे (वय १६) जखमी झाले असून दोघांना चंद्रपूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहिती नुसार, तनिस दुर्गे यांचे रामपूर येथे बाजार समिती समोर चिकनचे दुकान आहे. माजी नगरसेवक विलास तुम्हाने यांचे दुर्गे सोबत मटन विक्रीवरून मतभेद असल्याने आज रविवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गे यांच्या दुकानात जाऊन विलास यांनी वाद घातला.आणि वाद वाढल्याने तनिस याच्यावर वार केला. यात तो जखमी झाला.

मात्र जवळच असलेल्या जतीनने आपल्या भावाला मारहाण केली म्हणून जतीन (वय२१) याने विलास तुम्हाने यांच्यावर सत्तूरने जबर वार केला. यात विलास तुम्हाणे गंभीर जखमी झाला असून दोघांनाही चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.