बांबू संशोशन व प्रशिक्षण केंद्राची IAS अधिका-यांमार्फत चौकशी होणार

0
192

•  बांबू संशोशन व प्रशिक्षण केंद्रातील दोन इतारतीं जळून खाक
• 15 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

चंद्रपूर : लगतच्या चिचपल्लीत साकारत असलेल्या बांबू संशोधन व शिक्षण केंद्रातील इमारतीला गुरूवारी लागलेल्या भिषण आगीत दर्शनी भागातील दोन इमारती जळून खाक झाल्या आहेत. यात 15 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आयएएस अधिका-यां मार्फत चौकशी केली जाणार आहे,अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वस तथा जिह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

चंद्रपूरातील चिचपल्ली येथे 91 कोटींच्या निधीतून तयार होत असलेली इमारत जळाल्याची माहिती मिळताच आज शुक्रवारी राज्याचे मदत व पुनर्वस तथा जिह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुपारच्या सुमारास पाहणी केली. यावेळी प्रशिक्षण केंद्राला आग कशामुळे लागली हे कळाले नसून सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी अंती या प्रकरणात दोषी असणा-यांवर कारवाई केली जाणार असून, बांबू व प्रशिक्षण केंद्राशी संबंधीत असणा-या अधिका-यांशी शनिवारी बैठक सुध्दा बोलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बांबू व प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम योग्य असला तरी बांबूचे प्रशिक्षण देण्यासाठी इमारतीला बांबू मोठ्या प्रमाणात लावण्याची कुठल्याही प्रकारची गरज नव्हती. या घटनेमुळे 90 कोटी रूपये पाण्यात गेले असून, मान्यतया देतानाच सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. हे प्रशिक्षण केंद्र वनविभागाच्या साडेबारा हेक्टरमध्ये उभे आहे. विकासाच्या इतर गोष्टी करताना फॉरेस्ट कन्झरर्वेशन ॲक्ट आडवा येतो. मग या ठिकाणी या कायद्याचा विचार का केला नाही, असा प्रश्न पालकमंत्री वडेट्टीवारांनी उपस्थित केला.

सदर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करीत असताना कन्सल्टन्सीला किती खर्च झाला,अग्निरोधक यंत्रणेची काय व्यवस्था होती, बांबूचे फायर ट्रिटमेंट झाले की नाही, या सर्व प्रश्नांची खोलात जावून चौकशी केली जाणार आहे. चौकशी अंती दोषी असणा-यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, याप्रकरणाची सिआयडी मार्फतीने चौकशी करण्याची मागणी घटनेच्या दिवशी केली होती. या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी, आपण सिआयडीच्या वर जावून चौकशी करणार असल्याचे सांगितले. सिआयडीच्या चौकशीला चार ते पाच वर्षांचा कालावधी जात असतो. परंतु आपल्याला काही दिवसात या केंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणायचा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्र्यांशी बैठक झाल्यांनतर आयएएस अधिका-यांच्या नेतृत्वातील एक समिती काही दिवसातच चंद्रपूरात दाखल होवून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामाची मुदत संपल्यामुळे कंत्राटदाराला दंड
बांबू संसोशन व प्रशिक्षण केंद्राचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. ऑगस्ट 2020 मध्ये बांधकामाची मुदत संपली आहे. तरीही बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सप्टेंबर महिण्यापासून संबंधीत कंत्राटदाराला दंड आकारणे सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडून माहिती पुढे येते आहे. सदर इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात असून बिआरटीसीकडे हस्तांरणाची प्रक्रीया पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे या आगीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नेमका कोणता विभाग या आगीसाठी दोषी आहे सामोर येणार आहे.