देवांशी सालेकर या चिमुकलीच्या उपचारासाठी १ कोटी ५८ लाखाचा खर्च

पालकाचे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट सह जनतेला आर्थीक मदतीचे आवाहन

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव (खुर्द) पो. नागरी येथील रहिवासी जितेंद्र संतोषराव सालेकर यांची मुलगी देवांशी वय २ वर्षे ४ महिने हिला “मुकोपा-लिसॅक्रायडोसिस एमपीएस टाईप -६” हा आजार झाला आहे. या आजाराच्या वैद्यकिय उपचारासाठी संदर्भिय डॉक्टरांनी “एजाइम रिप्लेसमेंट थेरपी ( ईआरटी )” या उपचाराची शिफारस केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचाराचा खर्च सुमारे १ कोटी ५८ लाख रुपये प्रत्येक वर्षासाठी सांगितला आहे. जितेंद्र सालेकर यांची आर्थीक परिस्थिती कमजोर असल्याने देवांशीच्या उपचाराचा सदर खर्च करण्यास ते असमर्थ आहे. या परिस्थितीत मुलीचे प्राण वाचविण्यासाठी सालेकर यांची दाही दिशा भटकंती सुरु आहे.

जितेंद्र सालेकर यांनी देवांशीच्या उपचाराकरीता स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट भद्रावती यांचे सह जनतेला आर्थीक मदत करण्याचे आवाहन केले आहे. जितेंद्र सालेकर यांच्या आवाहनानंतर देवांशीच्या उपचारासाठी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्ट निश्चितच मदत करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सांगितले.

सोबतच देवांशी च्या उपचारासाठी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जनतेला भावनिक आवाहन केले आहे. ट्रस्टद्वारे असे आवाहन करण्यात आले की,“सेव गर्ल चाईल्ड म्हणतो ना आपण.. ! मग आता खरी वेळ आली आहे, ‘ती’ ला वाचविण्याची… देवांशी एका दुर्मिळ आनुवांशिक आजाराने ग्रस्त आहे. तिच्या उपचाराला भक्कम आर्थीक पाठबळ पाहीजे आहे. चला तर मग ‘ती’ ला वाचवूया… जमेल तसी जमेल ती मदत करू या… ” असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रविंद्र शिंदे यांनी केले आहे.