रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये : पालकमंत्री ना.वडेट्टीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सावली कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट
•रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश
• तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार

चंद्रपूर : जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन प्लांट सुद्धा उभारण्यात येईल. त्यामुळे तालुक्यातील कोणताही रुग्ण ऑक्सीजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शन अभावी दगावणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देत ऑक्सिजनची सोय तालुक्याच्या ठिकाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जात असून पुढेही दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावली तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार तहसीलदार परिक्षित पाटील, नगरपंचायत, मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीन दुधावर तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केल्या जात आहे. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण वाढत चाललेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला असून तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले असून त्यामाध्यमातून कोविड रुग्णाची तालुकास्तरावरच योग्य वेळी, योग्य उपचार तातडीने करण्यात येत आहे. असे असतांनाही काही रुग्णांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला न्यावे लागत असते मात्र येथे एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्वखर्चाने सावली येथे खाजगी तत्वावर चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत असून रुग्णाना विनामूल्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. लसीकरणाचे काम सुरू असले तरी सुध्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे तसेच 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना विनामूल्य लस देण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी दिलेत.

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी होऊ नये त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याचे ही काम युध्द पातळीवर सुरू आहे. तसेच माझ्याही विभागाकडून कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लॅंट यासह साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

कोविड केअर सेंटरची पाहाणी: आज पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देत पाहणी केली व रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. याठिकाणी 48 आयसोलेशन बेड तर दोन ऑक्सीजन बेड असे एकूण 50 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.

ग्रामीण रुग्णालयाला भेट: तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपलब्ध खाटांची संख्या, औषध साठा, रुग्णालयाची स्वच्छता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती याची माहिती घेत या संकटाच्या काळात रुग्णांना योग्य उपचार वेळेत द्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.