चंद्रपूर : दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आज (दि.२८) ला घोडपेठ परीसरातील घोट निंबाळा येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या पतीला आर्थीक सहकार्य देण्यात आले.
घोट निंबाळा येथील महिला रजनी भालेराव चिकराम या शेतात काम करीत असतांना तीच्यावर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. या घटनेची दखल घेवुन मृत महिलेचा शेतकरी पती भालेराव किसन चिकराम, गणेश भालेराव चिकराम यांना दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश वितरीत करण्यात आला.
दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या सर्वच तालुक्यातील शाखेतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासल्या जात आहे.
याप्रसंगी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, घोडपेठ ग्रा.प. चे सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.प. सदस्य गटनेते ईश्वर निखाड़े, ज्योती मोरे, लिनाताई बोबडे, रुपाली बावणे, माजी उपसरपंच विनोद घुघुल, सामाजिक कार्यकर्ता सुधाकर मोरे, सचिव पोहरे साहेब, बैंकेचे व्यवस्थापक संजय जेनेकर, निरिक्षक अरुण मांडवकर आदी उपस्थित होते.
यावेळी संपन्न कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवी शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.