करोनाग्रस्त वृद्धाची आत्महत्या; ऑक्सिजनच्या पाइपने घेतला गळफास

0
300
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नागपूर: करोनावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

पुरुषोत्तम गजभिये असं मृताचं नाव असून ते ८१ वर्षाचे होते. रुग्णांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या बारीक पाइपने त्यांनी बाथरूममध्ये गळफास घेतल्याची माहिती आहे. रात्रीच्या ड्युटीवर असलेला सफाई कर्मचारी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी गेला होता. दरवाजावर थाप मारूनही बराच वेळ कुणीही बाहेर येत नसल्यानं त्यानं ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा गजभिये मृतावस्थेत आढळून आले.

गजभिये हे नागपूरच्या रामबाग परिसरातील रहिवासी होते. २६ मार्च रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर ‘सुसाइड नोट’ आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.