• चंद्रपूर शहरातील रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती
चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरातील काही खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. मात्र, शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्क पेक्षा अधिक अवाजवी दराने देयके आकारुन खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून रक्कम वसूल करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयाच्या अवाजवी बिलाविरोधात कारवाई करण्यासाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे रुग्णांच्या नातलगांनी आधी खात्री करावी, बिलाविषयी शंका असल्यास महानगर पालिकेमार्फत नियुक्त ऑडिटरकडे खातरजमा करावी आणि मगच कोरोना बिल भरावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
शासन आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यासह महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील २१ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त जर बिल रकमेत तफावत आढळली किंवा रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेतली असल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांनी असा प्रकार आढळल्यास सदर रुग्णालयातील नियुक्त लेखा अधिकाऱ्यांची भेट घ्यावी.
यापुढे कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यावर रुग्णांची देयके ही महानगरपालिका प्रशासनाने नेमलेल्या ऑडिटर द्वारा प्रमाणित करून घेतल्याशिवाय अंतिम होणार नसून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खाजगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. संबंधीत रुग्णालय प्रशासनाने याबाबत कुठलीही कुचराई केल्यास त्यांच्यावर उचित नियम व कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.