जाज्वल्य देशप्रेम ! पुलवामा शहीद पतीचाच युनिफॉम घालून नितीका धौंडियाल भारतीय सैन्यात दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितीका कौल या भारतीय सैन्यात सामील झाल्या आहेत. त्यांनी शहीद मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांचाच गणवेश परिधान करून श्रद्धांजली वाहिली.

सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितीका धौंडियाल’ बनल्या आहे. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.

18 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे मेजर धौंडियाल यांना वीरगती प्राप्त झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 40 सैनिक शहीद झाले होते.

या हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम राबवली होती. पिंगलानमध्ये झालेल्या या चकमकीत 40 सैनिक ठार झाले. या हुतात्म्यांमध्ये प्रमुख रँक अधिकारी विभूती धौंडियाल यांचादेखील समावेश होता.

मेजर धोंडियाल आणि नितीका यांच्या लग्नाला अवघा 10 महिन्यांचा काळ उलटला होता आणि एप्रिल 2019 मध्ये दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाल्या की, पतीची ही आहुती अनेक लोकांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल, याचा मला विश्वास आहे.

मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव आपल्या गावी पोहोचले तेव्हा पत्नी नितीका यांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटला. मेजर धौंडियाल यांच्या मृतदेहाजवळ उभे राहून नितीका यांनी आपल्या पतीला सलाम केला. नितीका म्हणाल्या, ‘तू माझ्यापेक्षा आपल्या देशावर अधिक प्रेम करतोस आणि मला त्याचा अभिमान आहे. माध्यमांशी बोलताना नितिका म्हणाल्या होत्या की, त्या एका हुतात्माच्या पत्नी असून, त्यांना आपल्या पतीचा अभिमान आहे.’

नितीकाने ज्या प्रकारे आपल्या शूर पतीला साश्रू नयनांनी ‘जय हिंद’ म्हणत अंतिम निरोप दिला, तेव्हापासून त्या सर्वांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. 30 वर्षीय नितिकाने गेल्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा दिली होती, त्यानंतर त्या सैन्यात दाखल झाल्या. आता त्या देखील आपल्या पतीप्रमाणेच सैन्याच्या अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून शत्रूविरूद्ध लढायला सज्ज झाल्या आहेत.