अमृतच्या कंत्राटदाराला दंड आकारणार, भोजन पुरवठ्याचे वादग्रस्त कामही बंद करणार..

0
577
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आमसभेत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले

चंद्रपूर : शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची गती धिमी आहे. परंतु महानगरपालिकेतून अमृतच्या कंत्राटदाराला पैसे देण्याची, कंत्राटदाराची देयके मंजूर करण्याची गती खूप जास्त असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
सुरुवातीला २२७.९६ कोटी रुपयांच्या या योजनेला सुधारित मान्यता दिल्यानंतर या योजनेसाठी २३४.९५ कोटी मंजूर झाले.त्यापैकी केंद्र शासन, राज्य शासन व मनपाचा हिस्सा धरून आतापर्यंत २२७.९६ कोटी रुपये मनपाला प्राप्त झालेले आहेत.यापैकी २०३.०४ कोटी रुपयांचे देयके कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे.या कामासाठी पहिल्यांदा ३१ डिसेंबर २०१९ व दुसऱ्यांदा शासनाकडून ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.३१ मार्च रोजी ही मुदत संपत असल्यामुळे १ एप्रिल २०२१ पासून अमृतच्या कंत्राटदाराला दररोज दंड आकारण्यात यावा अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी लावून धरली.क्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवठा करण्याच्या कामात गैरप्रकार झाल्यामुळे तसेच या कामाची मुदत संपलेली असल्यामुळे वादग्रस्त कंत्राटदाराचे काम रद्द करण्याची मागणी सुद्धा देशमुख यांनी केली. यावर अमृतच्या कंत्राटदाराला दंड आकारणे तसेच भोजन पुरवठा चे काम रद्द करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश महापौर राखी कंचर्लावार यांनी आयुक्त राजेश मोहितेना दिले.

चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आमसभेत आज पुन्हा एकदा मलयुक्त गाळ सांडपाणी व्यवस्थापन धोरणावरून सत्ताधारी नगरसेवकांमधिल गटबाजी पुढे आली. केंद्र शासनाच्या या धोरणानुसार शहरातील सर्व नागरिकांना शौचालयाच्या सेप्टिक टँक साठी तीन वर्षातून एकदा १००० रुपये ते २००० रुपये पर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे.तसेच तीन वर्षातून एकदा शौचालयाची सेप्टीक टॅंक खाली करण्याचे धोरण सुद्धा राबविण्यात येणार आहे. चंद्रपूरकरांच्या डोक्यावर आधीच टॅक्सचे मोठे ओझे असल्यामुळे तसेच कोरोना मुळे शहरातील बहुतांशी नागरिकांची आर्थिक स्थिती बिघडलेली असल्याने कोणतेही नवीन शुल्क नागरिकांवर लादण्यात येऊ नये अशी मागणी माजी महापौर अंजली घोटेकर, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. या मागणीला सत्ताधारी पक्षातील अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आज पुन्हा एकदा सत्तधारी पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे आमसभेत पाहायला मिळाले. माजी महापौर घोटेकर यांनी सेप्टीक टॅंक वरचे शुल्क लावण्याचा विषय स्थगित करण्याची मागणी लावून धरल्याने संतापलेल्या महापौर कंचर्लावार यांनी ‘ज्यांचा विरोध असेल त्यांनी लेखी पत्र द्यावे’ असे निर्देश आमसभेत दिले.

जटपुरा गेट येथे कांजी मार्केट समोरील खुल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या विषयाला मंजुरी देण्याची मागणी नगरसेवक देवेंद्र बेले यांनी केली.आमसभेत सर्वसंमतीने हा विषय मंजूर करण्यात आला.