आज मध्यरात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट

0
630
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात आलीय. घट झालेल्या किंमती आज मध्यरात्री १२.०० वाजल्यानंतर लागू होतील. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही माहिती देण्यात आलीय.

करोना संक्रमण काळात देशातील जनता आरोग्यासोबतच महागाईचाही मार सहन करतेय. पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमतींनी नवे रेकॉर्ड सेट केलेले असतानाच घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी लोकांच्या चिंतेत आणखीन भर टाकली होती. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल – डिझेलच्या किंमतींत जवळपास आठ रुपयांनी वाढ झालीय. तर एलपीजी गॅसमध्ये तब्बल १२५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

गेल्या काही महिन्यांत सहा वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. अर्थात केवळ दोन महिन्यांत प्रती सिलिंडर दरात १२५ रुपयांहून अधिक वाढ झालीय.