चंद्रपूर : गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्यात असलेली दारुबंदी मंत्रिमंडळाने आता उठवली आहे. बंदी उठल्यानंतर लिकर असोसिएशन आता सक्रिय झाली आहे. आपले परवाने पूर्ववत करण्याच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसांत दारू सुरू होण्याची चिन्हे आहे. दुकाने पुन्हा सुरू झाल्यास विक्रेते त्यांच्या जुळलेल्या छोट्या, मोठ्या विकत्यांची चांदी होणार आहे.
औद्योगिक जिल्हा असल्याने दारू व्यावसायिकांना पूर्वी सुगीचे दिवस होते. मात्र दारूबंदी झाल्यानंतर या व्यवसायातील काहींना आपल्याकडील मालमत्ता विकून कर्ज भरावे लागते तर काहींनी अन्य व्यवसायाला पसंती दिली आहे. मात्र या व्यवसायात पैसा अधिक असल्यामुळे दुसऱ्या व्यवसायात बहुतांश जणांचे मनच रमले नाही. दरम्यान, राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेताच या व्यावसायिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे, बेरोजगार झालेले तसेच विविध ठिकाणी कामासाठी गेलेल्या आपल्या जुन्या आणि विश्वासू सहकाऱ्यांनाही बोलावणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, बंदी हटताच या व्यवसायाशी निगडित अन्य नागरिकांनी व्यावसायिकांच्या भेटीगाठीही घेणे सुरू केले असून किमान आता सुगीचे दिवस येतील, अशी त्यांना आशा आहे.
अनेकांनी विकल्या मालमत्ता
दारूबंदी झाल्यानंतर अनेकांना जगणे कठीण झाले होते. व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर आली. घेतलेले कर्ज कसे भरावे या विवंचनेत अनेकांनी स्वत:कडील मालमत्ता विकल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. तर काहींनी यातून सावरत नवनवे व्यवसाय सुरू केले.
अशी होती संख्या
देशी दारूची दुकाने १०६, वाईन शाॅप २४, बार- ३१३, बिअर शाॅपी ५१
चढाओढ सुरू
बार, बिअर शाॅपी चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार लागतात. विशेष म्हणजे, या कामात तरबेज असलेल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून यासाठी चढाओढही लागली आहे. काहींनी तर अन्य जिल्ह्यातील कामगारांना बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.