• सहा महिन्यापासून कंत्राटी कर्मचा-यांचे पगार थकीत
• जमा झालेले 4027 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यरत ५०० कंत्राटी कर्मचा-यांचे पगार मागील ६ महिन्यांपासून थकीत असल्याने आज गुरूवारी 21 जानेवारी 2021 ला जनविकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान भिकेच्या स्वरूपात जमा झालेले चार हजार सत्तावीश रूपये जिल्हाधिकारी अजय गुन्हाने यांचे मार्फतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आले.
गांधी चौकातून दुपारी एक वाजता या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो महिला-पुरुष कामगार हातात भिक्षा पात्र व गळ्यात फलक लटकवून आंदोलनामध्ये सहभागी झाले. गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,जटपूरा गेट व कोविड रूग्णालयासमोर ठिय्या मांडून कंत्राटी कर्मचा-यांनी भिक मागितली. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून ये जा करणा-या वाहनांना थांबवून भिक मागीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सामान्य रुग्णालयामध्ये पप्पू देशमुख व मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात काही कर्मचाऱ्यांनी कोविडचे जिल्हा समन्वयक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या कक्षामध्ये जाऊन तिथे उपस्थित वैद्यकीय रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता हजारे यांचेकडे भिक मागीत आपली समस्या प्रशासनापर्यंत पोहचविली. परंतु तिन्ही अधिकाऱ्यांनी मौन बाळगून भिक देण्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून खाली चादर अंतरून भिक मागो आंदोलन करण्यात आले. यामध्ये जमा झालेले चार हजार सत्तावीश रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देण्याची घोषणा केली.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना कंत्राटी कर्मचा-यांचे पगाराची 6 महिण्यापासूनची थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर भिक मांगो आंदोलनातून जमा झालेले 4 हजार 27 रूपये धनादेशाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आले. आठवडाभरात थकीत पगार व किमान वेतनाच्या बाबतीत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला. कोविड सारख्या महामारीच्या आजारादरम्यान जिवाची पर्वा न करता ज्यांनी दिवसरात्र कामे केले त्या कर्मचा-यांची पगार थकीत ठेवून शासन होरपळ करीत असल्याने शासन प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त केल्या जात आहे.
आंदोलनाच्या यशस्वी करिता जन विकास कामगार संघाचे सतीश येसांबरे,कांचन चिंचेकर,अनिल दहागावकर,राहुल दडमल, ज्योती कांबळे, नीलिमा वनकर , अमोल घोडमारे, सतीश घोडमारे, राकेश मस्कावार, बबीता लोडल्लीवार, भाग्यश्री मुधोळकर, सुनयना क्षिरसागर ,किशोर रोहनकर, रवी काळे ,प्रफुल बजाईत, हर्षल पंदीलवार , सुहास पानबुडे, प्रवीण अत्तेरकर, राज राठोड, विक्की दास ,सरीता खोबरागडे, सुरेखा मडावी, कल्पना शिंदे, , सुनिता रामटेके, कविता सागोरे, सपना दुर्गे, गीता मून यांनी परिश्रम घेतले.