• चंद्रपूरातील अवैध दारूविक्रीकडे गृहमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
चंद्रपूर : वाढती गुन्हेगारी, दारूबंदीनंतरही राजरोसपणे होणारी विक्री, महिलांवरील अत्याचार, पत्रकारांवर होणारे हल्ले या विविध समस्यांकडे राज्याच्या गृहमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याने चंद्रपूरात दोन दिवसीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरिता आलेल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना बल्लारपूरता काळे झेंडे आणि फलक दाखविण्यात आले.
चंद्रपूरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा असल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख काल गुरूवार पासून दोन दिवसीय दौ-यावर आले होते. आज शुक्रवारी 22 जानेवारी ला कार्यकर्ता मेळाव्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख बल्लारपुर ला उपस्थित होण्याकरिता आले होते. बल्लारपूरात गृहमंत्र्यांचा काफिला नवीन बसस्थानकाजवळ पोहताच त्यांना बल्लारपुर येथील भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि काळे फलक दाखवून वाढत्या गुन्हेगारीचा निषेध केला. जिल्ह्यातील वाढती अवैध दारूविक्री बंद करा, पत्रकावरील हल्ले थांबवा, वाढती गुन्हेगारीला रोका अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरून गृहमंत्र्यांना दाखविले. राज्याचे गृहमंत्री ह्या समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचा नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनात भाजयुमो चे कार्यकर्ते ओम पवार, सचिन डोहे, प्रतीक बरसागडे, रिंकू गुप्ता, मोहित डंगोरे,संजय वाजपेयी, श्रीकांत उपाध्याय, आदित्य शिंगाडे, निलेश कटारे, कुणाल श्रीरसागार,अदनान शेख, प्रचलित धंदरे,सिराज शेख आदी सहभागी झाले होते.