वेतनाची मागणी केल्यामुळे ‘आरोग्य सेवा चंद्रपूर’ वॉट्स ॲप ग्रुपमधून केले रिमुव्ह ; वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये रोष

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यांने आपल्या थकीत वेतनाची मागणी केली. वरिष्ठांनी त्या मागणीची दखल घेण्याची गरज असताना, त्याला चक्क ग्रुपमधून रिमूव्ह केल्याचा प्रकार शनिवारी घडला. या घटनेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘आरोग्य सेवा चंद्रपूर’ या नावाने एक वॉट्स ॲप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत. या ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांद्वारे राबविलेले उपक्रम तसेच त्यांच्या मागण्याबाबत नेहमीच साधकबाधक चर्चा होत असते. शनिवारी घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाम वाकडकर यांनी आपल्या दोन महिन्यांच्या थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकीत मानधनाच्या मागणीचा मेसेज टाकला. ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे सोडून डॉ. माऊलीकर यांनी चक्क त्यांना ग्रुपमधून रिमुव्ह केले. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून आपल्या अधिकाराची मागणी करणे गुन्हा आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.