महानगरपालिका पदाधिकारी व आयुक्त यांना बरखास्त करावे -शहर विकास आघाडीची मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर महानगरपालिका पदाधिकारी व आयुक्त यांना बरखास्त करावे -शहर विकास आघाडीची मागणी

चंद्रपूर : प्रत्येक कामामध्ये टक्केवारी, अनेक कामांमध्ये भागीदारी तसेच काम मिळविण्यासाठी दादागिरी ही नवीन प्रथा मनपातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली आहे.मनपातील पदाधिकाऱ्यांच्या अशा कारभारामध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी सुद्धा हातात हात घालून सामील झालेले आहेत. त्यामुळे भरमसाठ मालमत्ता कर देणाऱ्या चंद्रपूरकरांच्या तसेच शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे संपूर्ण राज्यात चंद्रपूर महानगरपालिकेची बदनामी होत आहे. 29 जुलै च्या सर्वसाधारण सभेत झालेला प्रकार हा या बदनामीचा कळस आहे.

मनपातील भ्रष्ट अधिकारी व पदाधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, आजपर्यंतच्या सर्व वादग्रस्त कंत्राटाची चौकशी करण्याच्या हेतूने विशेष चौकशी समिती गठित करण्यात यावी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे व स्थायी समिती अध्यक्ष रवि आस्वानी या सर्वांना बरखास्त करून मनपामध्ये प्रशासक बसविण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख,नगरसेवक दिपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे व नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिली.

29 जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये नियमाचे उल्लंघन केल्याने विरोधी पक्षातील काही नगरसेवक तसेच सत्ताधारी पक्षाचे समर्थक असलेल्या एका नगरसेवकावर कारवाई करण्यात आली.या सभेमध्ये पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर राखी कंचर्लावार यांनी विरोधकावर नेम प्लेट व पाण्याची बॉटल फेकून लोकशाहीत एक नवीन पायंडा सुरू केला.पीठासीन अधिकारी यांच्या सोबत बसलेले उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांनीसुद्धा खाली उतरून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करणे, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे अशी गंभीर कृत्य केली.महापौरांचे पती असलेले नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.महानगर पालिका अधिनियमातील कलम 12 नुसार या सदस्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची असतानाही आजपावेतो आयुक्त राजेश मोहिते यांनी त्यांचेविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. सभागृहात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पीठासीन अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांना आयुक्त राजेश मोहिते कोणत्या आधारावर कारवाईतून सूट देत आहेत, हा आमचा प्रश्न आहे असा सवाल आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनपातील शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी केला.

आयुक्त राजेश मोहिते या सर्वांचा बचाव करित असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे दोषी पदाधिकारी व नगरसेवक यांच्या सोबतच आयुक्त राजेश मोहिते यांना बरखास्त करून चंद्रपूर महानगरपालिकेवर प्रशासक बसविण्याची मागणी करण्यासाठी दिनांक 3 ऑगस्ट रोजी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleगोपानी आयरन अण्ड पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन
Editor- K. M. Kumar