वेकोलि पौनी 3 कोळसा खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

0
190
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• खाजगी कंपनीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
• मृताच्या कुटूंबियांना भरीव मदत द्या

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील पौनी-3 खुल्या कोळसा खाणीतील पाण्यात खाजगी कंपनीत असलेल्या एका कामगाराचा बुडून मूत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (3 एप्रिल 2021) ला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशाल गणपत हंसकर (वय 19) मु. वरोरा असे मृतकाचे नाव आहे. कोळसा खाणीतील बरेचशे काम खाजगी कंपनीच्या माध्यमातून केले जात असून सदर मृतक मुन्ना कंत्राटदाराकडे कार्यरत होता. कोळसा खाणीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने खाणीत अपघातांच्या घटना घडत आहेत.

बल्लारपूर वेकोली क्षेत्रांतर्गत पौनी 3 ही कोळसा खाण आहे. यामध्ये खाजगी कंपन्यांचा भरणा करून त्यामाध्यमातून कोळसा काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याच खाणींमध्ये सध्या मुन्ना कंत्राटदाराकडे वरोरा येथील विशाल हंसकर आज शनिवारी दिवस पाळीत कामावर होता. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खाणीत साचलेल्या पाण्यातील मोटार पंपचा पाईप जोडण्यासाठी गेला असता पाण्यात तौल जावून तो बुडाला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोळसा खाणीत कार्यरत खाजगी कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेकडे नेहमीच दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे खाणीत अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे कामगारांमध्ये बोलल्या जात आहे. विशाल हंसकर याचाही मृत्यू कामावर असताना त्याला कोणतीही सुरक्षा प्रदान न करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे मृताच्या कुटूंबियांना भरीव मदत देण्यासोबतच कोळसा खाणीत कार्यरत कामागरांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.