रामाळा तलावाच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन मागे घ्या :  प्रशासनाचे विनंतीपत्र

0
17

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना त्यांचा अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे विनंती पत्र आज महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते व तहसिलदार निलेश गोंड यांचे हस्ते देण्यात आले.

सदर पत्रात पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याकरीता रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यांकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसात सादर करण्याबाबत तसेच रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरण करण्याकरीता दोन टप्यात कामे पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली असून रामाळा तलाव खोलीकरण बाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असल्याचे व तो लवकरच पर्यटन विभागास सादर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

खोलीकरणाबाबत पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करुन भारतीय पुरातत्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजुर करणेस विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

रामाळा तलावात होणाऱ्या सांडपाण्याच्या विसर्जनावर उपाय म्हणुन महानगरपालिका चंद्रपूर यांचेकडुन सेवेज ट्रिटमेंट प्लँट तथा सांडपाणी प्रकल्प सयंत्र व रिटेनिंग वॉल बाबत प्रस्ताव तयार करून पर्यटन विभागास सादर करण्यात येत असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. जिल्हा खनिज निधी मधुन रामाळा तलावाचे कामे करण्याकरीता सदर योजनेचे अध्यक्ष पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे यापत्रान्वये बंडू धोत्रे यांना कळविण्यात आले असून त्यांनी या अनुषंगाने सुरु केलेले अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here