चंद्रपूर : लोकवस्तीतील सांडपाणी नियमबाह्य रित्या सोडण्यात आल्याने रामाला तलाव अतिप्रदूषित झाला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील ५०० वर्ष जुना गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण करून सौंदर्याकरण करण्याच्या मागणीला घेऊन इको प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे, हे विशेष.
जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, १९७४च्या कलम २५/२६ अंतर्गत व वायू प्रदूषण व नियंत्रण अधिनियम १९८१ व धोकादायक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम १९८९ आणि दुरुस्ती नियम २०१६ नुसार कार्य करण्यासाठी संमती घेणे बंधनकारक आहे. पाण्याची प्रदूषण नियंत्रणाची पुरेशी व्यवस्था करणे आणि त्याची योग्यरित्या देखभाल व देखभाल करणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रामाला तलावाच्या पाण्याचे नमुने गोळा केले होते. या विश्लेषण अहवालात धक्कादायक बाब पुढे आली आहे.
सद्य:स्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरामधील निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणान्या बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये , लगतच्या नदीमध्ये मिसळल्या जाते व उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमीनीमध्ये मुरून भू – जल सुद्धा प्रदूषित होत आहे, यावर तातङीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत. प्रदूषणाचे आकडे किमान मर्यादेपेक्षा अधिक आहेत. या तलावाच्या आजूबाजूला मानवी वस्ती आहे. येथील सांडपाणी स्थानिक नाल्यातून तलावात सोडल्याने तलावाच्या पाण्याची गुणवत्ता नष्ट होत आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्यात इकोर्निया वनस्पतीची मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम व वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तलावामध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बंद करण्यात याव्यात, इकोर्नियाच्या झाडे व वनस्पती हटविणे व विल्हेवाट लावणे, भूगर्भात दूषित पाणी बंद करणे, रामाळा तलाव स्वच्छतेचा दीर्घकालीन कृती आराखडा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.