कैलासनगरात दारू दुकान रात्री सील तर सकाळी सुरु

0
2270
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाची केली होती कारवाई
• पोलिस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात वाढतेय दारू तस्करी

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातून सर्रासपणे अवैधरित्या दारू तस्करी होत असल्याच्या कारणावरून वणी तालुक्यातील कैलास नगर येथील परवानाधारक देशी दारूचे दुकान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करून काल शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सील केले होते मात्र आज शनिवारी 6 फेब्रुवारी ला सकाळी दारू दूकान सूरू झाल्याचा चमत्कार अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत घुग्घुस पासून दहा किलोमीटर अंतरावर कैलास नगर गाव आहे. येथे मंदाताई कळसे यांच्या मालकीचे परवाना धारक देशी दारूचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून सदर परवानाधारक दुकानाला सील केले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील एखाद्या परवानाधारक दुकानावर कारवाई करून दुकान सील करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई होती. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी याच देशी दारू दुकानांमधून १९४ पेटी देशी दारू चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा येथे तस्करी होत असताना पकडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि यवतमाळच्या अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कैलासनगर येथे सदर परवाना धारक देशी दारू दुकान जावून तपापणी करणार होते. याची माहिती दुकानदाराला होताच रात्री ८ च्या सुमारास दुकान बंद करून पोबारा केला. यामुळे अधिका-यांनी संतापून देशी दारूच्या दुकानावर कारवाई करून सील केले. मात्र आज सकाळी कैलासनगर मध्ये चमत्कार पहायला मिळाला. रात्री सील केलेले दुकान सकाळी सुरू होते. अधिकाऱ्यांनी रात्री सील केलेले दुकान उघडण्याचे अधिकार कुणालाआहेत? सील केलेले दुकान उघडण्यासाठी काही प्रक्रियाकरावी लागतेका? सील केलेले दुकानदाराला उघडता येते का? जर त्याने दुकान उघडले असेल तर त्याला हा अधिकार कोणी बहाल? यामध्ये अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची मूक संमती आहे का ? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण झाले आहेत.

पाच वर्षापूर्वी युती शासनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आहे. बंदीनंतरही चंद्रपूर सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची तस्करी सुरू असल्याच्या घटना अलीकडेच घडलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात येत असलेले दारूने भरलेले ट्रक पकडून अवैधरित्या होत असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला होता. सोबतच राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारू तस्करीला रोखण्याकरिता कडक पावले उचलण्याची विनंती केली होती.

तर पोलिस अधीक्षकांना भेटून दारू तस्करी रोखण्याच्या सुचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या विभागाचे अबकारी विभागाचे अधिकारी दारू तस्करी रोखण्याकरिता सक्रिय झाले आहे. काल शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील अबकारी विभागाचे अधिकाऱ्यांसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कैलास नगर मध्ये जाऊन संयुक्त कारवाई केली परंतु सकाळी परत कैलासनगरात दारू दुकान सुरू झाल्याने अबकारी विभागाने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या घटनामुळे चंद्रपूरच्या दारूबंदीचा फज्जा उडाला आहे.