गोंडपीपरी (चंद्रपूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे ब्रिद असतांनाही पोलिस विभागातील काही अपवादात्मक अधिकारी तसेच कर्मचारी वगळता इतरांनी माञ अधिक मिळकतीच्या आकसेपोटी विभागाच्या ब्रिद वाक्याचा विसर पडल्याचे गोंडपीपरी शहरातील मुख्य पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या एसीबी पथकाच्या कारवाईतून पुन्हा एकदा पुढे आले असून सलग दुसऱ्यांदा लाचेच्या सापळ्यात अडकलेला भ्रष्टाचार ग्रसित विभाग, तक्रारदार व कारवाई पथक हे समान असून त्या ‘दोन ‘पोलिसांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे सलग तीसर्यांदा पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी होताच अनेक मार्गाने दारू तस्करी सुरू झाली. वाढत्या अवैद्य व्यवसायिकांनी डोके वर काढल्याने दारूबंदी हा काळ पोलिसांसाठी चांदी ठरला. काही पोलिस अधिकाऱ्यांनी अवैद्य दारू विक्री वर आपल्या दबंग शाही स्टाईलने धडक मोहीम राबवत कारवाईचा बडगा उगारल्याने बहुतांश ठिकाणी दारू व्यवसायिकांच्या मुसक्या आवळल्या. तर काही अधिकाऱ्यांनी दारू तस्करांशी साटेलोटे करून अवैद्य दारू विक्रीला चालना दिल्याने पुन्हा दारू विक्री जोमात सुरू झाली. अशाच अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्ते खोरी करणाऱ्या गोंडपिपरी येथील पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई देवेश कटरे व संतोष काकडे या दोघा ने गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण पोलिस ठाणे हद्दीत वसुलीचा सपाटा लावत पोलिस विभागाचे नियम पायदळी तुडवून केवळ आप मिळकती साठी अनेकांना वेठीस धरल्याचे प्रकार यापूर्वीच उघडकीस आल्याची माहिती आहे.
यात पोलिस ठाण्यातून पकडण्यात आलेली सुपारी रफादफा करून त्याची परस्पर विक्री करणे, दारू तस्करी करणारे वाहन पकडून आर्थिक व्यवहारातून परस्पर सोडून देणे तसेच तेलंगाना -महाराष्ट्र सीमेवरील वाहणाऱ्या नद्यांच्या घाटावरून दारू तस्करांना रोखण्याऐवजी महावारी हप्ते घेऊन दारुतस्करीला खत पाणी घालणे अश्या अनेक तक्रारी या दोन पोलिस कर्मचाऱ्याच्या वरिष्ठांपर्यंत पोचल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तर काल येथीलच एका ट्रक चालक मालकाकडे तू दारु तस्करी करतो व तुझा ट्रकचा व्यवसाय आहे.
आम्ही तुला कुठल्याही गुन्ह्यांत अडकवून तुझी गाडी पोलीस स्टेशनला लावतो असे धमकावून होमगार्ड करवी दहा हजार रुपयाची लाच घेताना गडचिरोली पथकाने होमगार्डला रंगेहात पकडून होमगार्ड विवेक राणा याच्या म्हणण्यानुसार पोलिस शिपाई देवेश कटरे व संतोष काकडे या पोलिसांना ताब्यात घेतले असता वरील दोन्ही पोलिस शिपायांनी घटनास्थळावरून एसीपी पथकातील कर्मचाऱ्यांना धक्का देऊन पळ काढला. मात्र एसीबी पथकाने आपली कारवाई सुरळीत पार पाडीत प्रकरणातील होमगार्डला अटक करून दोन आरोपींना फरार दाखविले आहे. तत्पूर्वी पोलीस खात्यात नव्यानेच सेवेत रुजू झालेले हे दोन्ही पोलीस शिपाई गेल्या अनेक वर्षांपासून आलेल्या प्रत्येक ठाणेदाराचा विश्वास संपादन करीत जवळीक साधून अवैद्य वसुली मोहीम राबवित अनेकांना वेठीस धरण्याचे प्रकार अगदी खुलेआम सुरू असताना तसेच याच पोलिस ठाणे अंतर्गत कार्यरत इतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये या सर्व प्रकारची कुजबुज ही सुरू असताना मात्र नियंत्रण ठेवणारे ठाणेदार यांनी सदर दोन पोलीस शिपाई यांना वारंवार पाठीशी घातल्याने त्यांचे भ्रष्टाचार प्रती मनोबल उंचावल्याचे काल घडल्या कारवाईनंतर बोलले जात आहे. भ्रष्टाचाराशी निगडित देवेश कटरे व संतोष काकडे या दोन पोलिसांची अधिक कसून चौकशी केल्यास अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती व अनेक कारनामे पुढे येणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
काल लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सलग दुसऱ्यांदा पोलिस विभागाचा विरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत पहिल्यांदा सापळ्यात अडकलेले तत्कालीन ठाणेदार प्रदीप सिंह परदेशी व दुसऱ्यांदा वाहतूक जमादार चीवंडे, व नुकतेच अडकलेल्या पोलिस शिपाई देवेश कटरे , संतोष काकडे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाली असून गोंडपिपरी पोलिस ठाण्याला लागलेले भ्रष्टाचाराचे ग्रहण केव्हा सुटणार याची खमंग चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे.