चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट शाळांसाठी 9 कोटी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शाळांना भौतिक सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच स्मार्ट स्कूल तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केल्यास 9 कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधला.

पालकमंत्री म्हणाले, आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व आहे, शिक्षक म्हटले की समाजाकडून अनेक अपेक्षा असतात. शिक्षक हा ग्रामीण भागातील आत्मा आहे. शिक्षक हा अतिसंवेदनशील असतो, जो समाजाप्रती जागरूक असतो तो शिक्षक असतो.

जो समर्पित भावनेने कार्य करतो तो शिक्षक असतो, शिक्षक हा समाजशील असतो करुणादायी असतो म्हणून शिक्षकाची व्याप्ती ही फार मोठी असते. शिक्षकांमध्ये समाज घडविण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.