सविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मूल येथे पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेल्या सविता अशोक गोविंदवार यांना गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या मानव्य विद्याशाखा अंतर्गत “मराठीतील बालकथा साहित्याचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर निवडक बालकथा लेखकांच्या विशेष संदर्भात त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत, समिक्षक, लेखक निवृत्त प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

सविता गोविंदवार यांचे शिक्षण मूल येथे झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. लेखन, वक्तृत्व, संशोधनाची आवड त्यांना विद्यार्थी दशेतच निर्माण झाली होती. त्या सद्या गडचिरोली बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत. पीएचडी साठी – स्वातंत्र्योत्तर मराठी बालकथा साहित्याचे मूल्यमापन करताना सविता गोविंदवार यांनी सुप्रसिद्ध बालकथा लेखक दिलीप प्रभावळकर, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे आणि डॉ. अनिल अवचट यांच्या बालकथा साहित्याची चिकित्सा आपल्या संशोधनांतर्गत केली. मराठी साहित्यात बालकथांचे स्थान निश्चित करणे, बालकथा साहित्याचे मानसशास्त्रीय पैलू अभ्यासणे, बालकांच्या व्यक्तित्व विकासात बालकथा साहित्याची भूमिका विशद करणे, आजच्या काळात बालकथांची गरज अभ्यासणे, निवडक बालकथाकारांच्या लेखनाचे वेगळेपण नोंदविणे ही त्यांच्या संशोधन कार्याची उद्दिष्ट्ये होती.

साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये बालकथा साहित्याचे विशेष महत्व असून बालकथा साहित्य बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते आणि मुलांना जगाकडे पाहण्याची दृष्टी देते असा निष्कर्ष त्यांनी सादर केलेल्या शोधप्रबंधातून मांडला. १९९० नंतरच्या कालखंडात मराठी बालकथा साहित्यात बालकथा साहित्यिकांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या बालकथांनी मराठी साहित्य समृद्ध केले असल्याचे त्यांनी नोंदविले. बहिस्थ परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. पी. विठ्ठल लाभले. प्राचार्य राजेश इंगोले, सौ. वीणा मोहरकर, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. सुरेश लडके, डॉ राम वासेकर, विनेश रामानुजमवार, बालसाहित्य समीक्षक डॉ. छाया कावळे, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. राजेश आणि डॉ. अर्चना चंदनपाट, अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार, समीर बोट्टवार, प्राचार्य चेतन गोरे, संदीप लांजेवार, प्रा. भगवान फाळके, अजित येरोजवार, मीराताई पद्मावार, डॉ. ज्ञानेश्वर हटवार, योगेश त्रिनगरीवार आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. बाळासाहेब पद्मावार, प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ. माधवी भट, डॉ. राजेश मुसणे, प्रा. नगराळे, प्रा. खानोरकर, प्रतिभा बोरसे, लायन्स क्लब गडचिरोली चे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.