उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत सर्व केडर यांचा मानधन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा – आ. जोरगेवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

चंद्रपूर : निधी अभावी चंद्रपूर जिल्हातील उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या केडरचे मानधन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी सदर सर्व केडरचा मानधन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन केली असून सदर मागणीचे निवेदन दिले आहे. ना. हसन मुश्रीफ यांनी याची तात्काळ दखल घेत निधी संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांना केल्या आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम सुरु असून ग्रामीण भागाला या अभियानाचा मोठा लाभ होत आहे. विविध प्रकारच्या प्रेरीका या अभियानाचा पाया आहे. त्यांना मुल्यांकना नुसार प्रति महिना मानधन दिले जाते. मात्र कोरोना महामारी काळात ग्रामीण भागात स्वयंसहायता समूह, ग्रामसंघाकरिता विविध कामे करणार्या प्रेरीकेचे मानधन दिले गेलेले नाही. राज्य कक्षाकडून मागील दोन वर्षापासून या योजनेकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने प्रेरीकांचे मागील १८ महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. जिल्हा कक्षांच्या वार्षिक आराखड्यापैकी ५० टक्के निधीही गतवर्षी देण्यात आलेले नाही. परिणामी प्रलंबित मानधन रक्कम सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा कक्षांना प्रलंबित मानधनासाठी त्वरित किमान ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील गटांना मिळणारा खेळते भांडवल आणि सूक्ष्म गुंतवणूक निधी याकरिताही निधीचा दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

तसेच सदर मानधन प्रति माह नियमितपणे कपात न करता देण्यात यावे, प्रत्येक ग्रामसंघाला आफिसकरिता जागा उपलब्ध देण्यात यावी, दर महिन्याचा बैठकानकरिता प्रवास भत्ता देण्यात यावा. आयसीआरपी यांना गणवेश देण्यात यावा, दहा हजार रुपये किमान मानधन देण्यात यावा अशी मागणीनीही सदर निवेदनातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना करण्यात आली आहे.