शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचेसह चार जणांना जुगार खेळताना अटक

चंद्रपूर : वरोरा शहरातील आनंदवन चौकातील एका हॉटेलमध्ये जुगार खेळताना झालेल्या वादातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मारहाण केली. या प्रकरणात मत्ते यांच्यासह चार जणांना वरोरा पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये जुगार सुरु होता. ते हॉटेल मत्ते यांच्या मालकीचे असल्याचे बोलले जात आहे.

पोळ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदवनातील या हॉटेल मध्ये मागील आठवड्याभरापासून मोठा जुगार सुरु होता. येथे जुगार खेळण्यासाठी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील प्रवीण पारखी (वय ३०) आला. प्रवीणने जुगारात जवळपास तास लाख रूपये जिंकले. त्याने एकहीत जुगारात सहभागी सर्वांचे खिसे रिकामे केले. त्यामुळे इतरांना त्यांच्यावर संशय आला.

यावेळी नितीन मत्ते सुद्धा हजर होते. त्यांनीच प्रवीणच्या भ्रमणध्वनीत सेंसर आहे. त्यामुळे तो जुगार जिंकत असल्याचा आरोप केला. त्याला मत्ते आणि हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण केले. यात प्रवीणला गंभीर दुखापत झाली. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे.

काल शुक्रवारला प्रवीणने वरोरा पोलिसात तक्रार केली. त्यांचा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मत्ते आणि इतर चार जणांवर भादंवी 324,143.147,149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मत्ते यांच्यासह चार जणांना अटक केली. शुक्रवारला न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे.