ऑक्सीजनचा ठणठणाट… कोरोना रूग्ण दिवसभर उन्हात

0
8
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बारा तासानंतर मिळाला त्या रूग्णाला वनराजीक कोविड केंद्रात बेड
चंद्रपूरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचाही आकडा चिंताजण ठरतो आहे. वाढत्या रूरूण संख्येचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर जाणवू लागला आहे. रविवारी चंद्रपुरात एका वृध्द कोरोना रूग्णांची ऑक्सीजनकरिता झालेली फरफट आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. काल रविवारी सकाळी एका 75 वर्षीय कोरोना बाधित वृध्दाची प्रकृती बिघडल्याने त्याला वनराजीक महाविद्यालयातील कोविड केंद्रात भरती करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी ऑक्सीजन नसल्याने त्यांला जिल्हा रूग्णालयातील कोविड केंद्रात नेण्यात आले. तेथेही ऑक्सीजन नसल्याने त्या रूग्णाला दिवसभर उन्हात फुटपाथवर झोपावे लागले. अखेर रात्री आठच्या सुमारास त्या रूग्णाला बेड उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे उपचाराअभावी दिवसभरात झालेली त्या रूग्णाची फरफट थांबली. मात्र कोविड रूग्णासोबत घडलेला हा प्रकार जिल्हा प्रशासनाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर शहर हॉटस्पॉट ठरले आहे. शहरातील सर्व कोविड रूग्णालये रूग्णांनी भरले आहेत. खाजगी रूग्णांलयांची स्थिती अशीच आहे. त्यामुळे रूग्णांची उपचार घेण्यासाठी धावपळ होत आहे. चंद्रपूर शहरातील समाधी वार्डातील 75 वर्षीय व्यक्तींची कारोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या रूग्णाला शहरातील रूग्णालयात एकही बेड उपलब्ध नसल्याने आणि रूग्णाची प्रकृती ठिक असेल तर घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो रूग्ण दोन दिवस घरीच उपचार घेत होता. परंतु रविवारी सकाळी त्याची प्रकृती बिघडली. त्याला कुटूंबियांनी लगेच त्याला वनराजिक महाविद्यालयातील कोविड केंद्रात घेवून गेले. त्या ठिकाणी प्रशासनाने जुळवाजुळव करून त्याला बेडची सुविधा उपलब्ध करीत त्याचेवर उपचार सुरू केले. परंतु प्रकृती पुन्हा बिघडू लागली. त्याला ऑक्सीजनची आवश्यकता होती. परंतु या ठिकाणी ऑक्सीजन नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी त्या रूग्णाला जिल्हा रूग्णालयातील कोविड केंद्रात आणले. परंतू या ठिकाणी त्याला ऑक्सीजन मिळू शकला नाही. त्यामुळे परत रूग्णाला वनराजिक महाविद्यातील कोविड केंद्रात आणण्यात आले. परंतु तोपर्यंत अगोदर मिळालेला बेड हा दुसऱ्या रूग्णाला देण्यात आलेला होता. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना या रूग्णाला कुठे ठेवायचा प्रश्न पडला. अखेर त्याला खाली ठेवण्यात आले. ना मिळाला बेड, ना मिळाला ऑक्सीजन दिवसभर तो उन्हात ऑक्सीजन आणि उपचारासाठी फरुटत राहिला. अखेर त्याच्या कुटूंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून आरोग्य व्यवस्थेबाबत होणारी गैरसोय प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. सदर रूग्णाला तातडीने बेड ऑक्सीजन उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.

अखेर वनराजिक महाविद्यातील कोविड केद्रात रात्री आठच्या सुमारास त्याला बेडची उपलब्धता झाल्याने भरती करण्यात आले. आणि उपचाराला सुरूवात करण्यात आली. मात्र दिवसभरात कोविड रूग्णाला उपचराअभावी फुटपाथवर झोपून राहावे लागल्याचा प्रकार जिल्हा प्रशासना आणि आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा ठरला आहे. या घटनेनंतरही जिल्हा प्रशासनाने कोविड रूग्णालयामध्ये आवश्यकता त्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleकोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला? वडेट्टीवार
Editor- K. M. Kumar