महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आणि परिणामी आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. पण आता दुसरी लाट ओसरत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच रत्नागिरीमधून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात सध्या अनलॉकला सुरुवात झाली आहे. 5 टप्प्यात महाराष्ट्रातील जिल्हे अनलॉक होत आहेत. त्यातच रत्नागिरी हा जिल्हा चौथ्या टप्प्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच 24 तासात जिल्ह्यात तब्बल 24 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
हळूहळू महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या वाटेवर असताना आता रत्नागिरीत 24 तासात 659 नव्या बाधीतांची नोंद झाली आहे. तसेच एका दिवसात 4 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांचं प्रमाण जिल्ह्यात वाढवण्यात आलं असून मृत्यूच्या संख्येसह नव्या बाधितांची संख्याही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन तो जिल्हा कोणत्या टप्प्यात ठेवायचा या संदर्भात निर्णय घेण्यात येत आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या टप्प्यातच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ बंधनात राहावं लागणार आहे.