दुर्गापूरला वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता प्रस्ताव सादर करा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची पाणीटंचाई मुळे मोठी गैरसोय होत होती, सर्वसामान्यांची गैरसोय दूर करणेकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. ना. श्री. संजय बनसोडे साहेब यांना या गावातील समस्या सांगत वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुर करणे संदर्भात विनंती केली तेव्हा त्यांनी संबंधित विभागाला लेखी व दूरध्वनीद्वारे तोंडी सुचना करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

सण २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत दुर्गापूर या गावातील लोकसंख्येची १७ हजार ६९३ एवढी नोंद होती त्यानुसार पाण्याच्या सोई संबंधाने एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असुन त्यातील पाण्याच्या टाकीची क्षमता जवळपास ६ लाख लिटर एवढी आहे परंतु सद्यस्थितीत गावाच्या वाढीव लोकवस्ती मुळे गावाची लोकसंख्या अंदाजे २५००० जवळपास झालेली असल्याने अस्तित्वात असलेल्या योजनेद्वारे पाणीपुरवठा अपुरा पडतो आहे.

यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळत नसुन मोठी गैरसोय होत आहे व म्हणून ही गैरसोय दूर व्हावी या करिता नितीन भटारकर यांनी या गावाकरिता स्वतंत्र व नवीन जवळपास १८ लाख लिटर क्षमता असलेली योजना मंजुर करून निधि उपलब्ध करून देण्याची विनंती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांना केली.

नितीन भटारकर यांनी निवेदनास्वरूप केलेल्या विनंती ला मान्य करीत मा. मंत्र्यानी जलजीवन अभियानाच्या मा. संचालकांना तात्काळ प्रस्ताव सादर करणे बाबत निर्देश दिल्याने लवकरच दुर्गापूर ग्रामवासीयांची होणारी गैरसोय दूर होणार. सर्वसामांण्यांची गैरसोय दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्ना करिता स्थानिक गावकऱ्यांनी नितीन भटारकर यांचे आभार मानले.