एखादा मेसेज टाकून मोबाईल हॅक करून ऑनलाइन काढायचे पैसे

0
214
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मास्टरमाइंड अजूनही फरार ; पोलिसांपुढे मोड्स ऑपरेंडीचा उलगडा

यवतमाळ : फसवणूक करण्यासाठी सुरुवातीला एखादा मेसेज टाकून मोबाईल हॅक करायचा. मग त्या नंबरशी निगडित खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वळते करायचे. परत तिसऱ्याच खात्यात टाकून पैसे काढायचे, अशी गुन्ह्याची मोड्स ऑपरेंडी असल्याचे बिहार येथून अटक करून आणलेल्या संशयिताने पोलिसांना सांगितली.ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड अजूनही फरार आहे. साजनकुमार पिता बिसनदेव ( वय २० , रा . दुर्गापूर , जि . नालंदा ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. दिग्रस शहरातील रेणुराव ठाकरे यांच्या बचत खात्यातून ९१ हजार तर फिक्स डिपॉझिट बॉण्डमधून एक लाख ४९ हजार रुपये असे एकूण दोन लाख ४० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली होती. या घटनेच्या नऊ महिन्यांनंतर या ऑनलाइन फसविणाऱ्या टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

साजनकुमार बिसनदेव हा मुख्य आरोपीच्या वाहनावर चालक आहे. त्याने सतत दोन वर्षे या फसवणुकीच्या कामात म्होरक्याला सहकार्य केले. त्यामुळे साक्षीदार म्हणून आणलेल्यासाजकुमारला गुरुवारी ( ता .११ ) पोलिसांनी आरोपी केले. रेकॉर्डवर आता दोघे आले असून, यात अजून काही मासे अडकण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल पुढील तपास करीत आहेत.