मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार ; जिल्ह्यातील हा पाचवा बळी

चंद्रपूर : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोहफुल वेचायला गेलेली 72 वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. ही घटना आज मंगळवारी (13 एप्रिल 2021) ला नागभिड तालुक्यातील तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत कच्चेपार जंगलात घडली. विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे असे मृत महिलेचे नाव असून ती धामणगाव चक येथील रहिवासी होती.

दरवर्षी उन्हाळ्यात मोहफुल वेचण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष जंगलामध्ये जात असतात. या मिळकतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आज मंगळवारी तळोधी (बाळापुर) पासून जवळच असलेल्या धामणगाव चक येथील 72 वर्षीय महिला विक्राबाई खोब्रागडे तळोधी (बा)वन परिक्षेत्रा अंतर्गत गोविंदपूर बिटातील कचेपार जंगल कक्ष क्र 70 मध्ये मोहफुल वेचायला गेलेली होती. गावालगतच जंगल असल्यामुळे या परिसरात वाघांचे वास्तव्य अगोदरपासूनच आहे. ही महिला जंगलामध्ये मोहफुल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढविलाआणि तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गावात होतात नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली.

सदर मृत महिलेच्या पश्चात 1 मुलगा,सून,नातवंड असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यात दोन पुरूष व एका महिला तसेच मुल तालुक्यात आगडी येथील एका इसम अशा चार जणांचा मोहफुल वेचायला गेले असता त्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.