कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवल्याने लोकांना या विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असं अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितलं आहे.
फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. हा कालावधी वाढविल्यास कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग आणखी फैलावू शकतो, असं फौसी म्हणालेत. ब्रिटनध्येही हे दिसून आलं आहे. मात्र कोरोना लसींचा तुटवडा असल्यास दोन डोसमधील कालावधी वाढवण्यास हरकत नाही, असंही अँथनी फौसी यांनी म्हटलं आहे.
भारताने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी दोनदा वाढविला. मार्चमध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. त्यानंतर हे अंतर 12 ते 16 आठवडे झाले. कालावधीतील वृद्धीमुळे लसीची परिणामकारकता वाढते, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं.