• पर्यटनबंदी बाबतचे नियम डावलले
• कोअर व बफर झोनमध्ये ३० जूनपर्यत परवानगी
• वन्यप्रेमींमध्ये तिव्र नाराजी
चंद्रपूर : कोरोनामुळे पर्यटनबंदी असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्पात शूटिंगला परवानगी देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. चेन्नई येथील वंदानूर प्राणीसंग्रहालयातील ९ वर्षीय सिंहीणीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून एनटीसीएने वन्यप्राण्यांनाही काेरोना होऊ नये म्हणून देशभरातील व्याघ्र प्रकल्पात पर्यटन बंदी केली. त्या नंतरही ताडोबात शूटिंगला परवानगी देण्यात आल्याने वन्यप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ताडोबा व्यवस्थापनाने ग्रे फिल्मस इंडिया लि.च्या नल्लामूथू यांना ‘वाईल्ड महाराष्ट्र’ या वृत्तपटाच्या शूटिंगसाठी कोअर व बफर झोनमध्ये ३० जूनपर्यत परवानगी दिली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डाॅ. जितेंद्र एस. रामगावकर यांनी याला दुजोरा दिला. संशोधन तसेच माहितीपर चित्रपटाच्या परवानगीला हरकत असण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, संसर्ग वन्यप्राणी यांना होऊ नये म्हणून एनटीसीएच्या निर्देशानुसार पर्यटन बंदी करण्यात आली आहे. फिल्म मेकिंगकरिता शूटिंगचा कमी इमॅक्ट असला तरी बंदीच्या काळात संरक्षणाच्या कामा व्यतिरिक्त कोणत्याही कामास परवानगी देण्यात येऊ नये. एकाला शूटिंगची परवानगी दिल्यास परत अन्य व्यक्तिंकडून किंवा अन्य ठिकाणी सुद्धा या आधारावर परवानगी मागितली जाऊ शकते. जनजागृती किंवा अन्य कारणासाठी चित्रपट निर्मिती करायची असल तरी पर्यटन सुरु झाल्यावर सुद्धा करता येईल
– बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर