अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह

0
249
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोविड चाचणी बाबत अजबगजब प्रकार
• रुग्णावर शासकीत वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू

चंद्रपूर : शहरातील एका रुग्णाची अँटीजेन चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. मात्र त्याच रुग्णाची पुढे आरटीपीसीआर चाचणी केली तर ती कोरोना निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे हा रुग्ण नेमका पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ? असा पेच नातेवाईकांसमोर उभा ठाकला आहे. सध्या या रुग्णावर शासकीत वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

शहरातील सिस्टर कॉलनी येथील 60 वर्षीय व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी डॉ. सोईतकर यांच्या रुग्णालयात न्यायचे होते. त्यासाठी त्यांची 10 मार्च रोजी दवाबाजार समोर असलेल्या महापालिकेच्या अँटीजेन केंद्रावर तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. हे गृहस्थ लकवाग्रस्त आहेत. त्यातही त्यांना मूत्रपिंडाचा आजार आणि रक्तदाब आणि मधुमेह आहे. काळजीमुळे त्यांची याच दिवशी आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.

रुग्णाला नीट चालता येत नसल्याने डॉ. कोल्हे यांच्या पॅथॉलॉजीमधून त्यांच्या नाक आणि घशातून नमुने गोळा करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठविण्यात आला. 11 तारखेला या नमुन्याची तपासणी करण्यात आली आणि 12 तारखेला मध्यरात्री अहवाल आला. तो निगेटिव्ह होता. यामुळे सर्व नातेवाईक बुचकळ्यात पडले. यादरम्यान डॉ. वासाडे यांच्या सल्ल्यानुसार रुग्णाच्या घरी कोरोनाचा उपचार सुरू होता. 13 तारखेला त्यांची ऑक्सिजन पातळी घसरली आणि त्यांना शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर व्याधी असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, या दोन चाचण्यांपैकी एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आल्याने सर्व गोंधळून गेले आहेत. मात्र, अजूनही शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ते पॉझिटिव्ह आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी चाचणी केली नाही यावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.