यवतमाळ : विवाहीत महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेतशिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आला. ही घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा राम शेडमाके (वय २८) रा.कारेगाव बंडल असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती मूळची पेंढरी येथील रहिवासी असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील रामा शेडमाके यांच्यासोबत झाला होता. अलीकडेच रेखा आपल्या माहेरी आली होती. रविवारी दुपारी पेढरी शिवारातील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून जमादार राहुल खंडागळे यांच्यासह पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भरत जपाइतकर करीत आहे.