चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मुधोली या गावातील एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. चेतन बबन जीवतोडे ( १६ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशेष म्हणजे, ताडोबा अंधारी क्षेत्रात लावण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले नसल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ताडोबातील गतीरोधकाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
रविवारी सर्पदंश झाल्यानंतर चेतन जीवतोडे याला प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेतून त्याला चंद्रपूरला पाठविण्यात आले होते. दरम्यान, ताडोबा – अंधारी बफर क्षेत्रात लावण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे त्याला रुग्णालयात आणण्यासाठी उशिर झाला. परिणामी रुग्णालयात नेता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.