ताडोबा व्याघ्रप्रकल्पात विद्युत शॉक लागून रिसॉर्ट व्यवस्थापकाचा मृत्यू

◆कोलारा गेट जवळील वन्य विलास रिसोर्ट येथील घटना

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील चिमूर तालुक्यात येणा-या कोलारा गेटजवळ असलेल्या देवरी (चैती) येथील वन्य विलास रिसॉर्टमधील व्यवस्थापकाचा पाण्याची मोटार स्वच्छ करीत असतांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (13 जून) ला दुपारी १ वाजता दरम्यान घडली.

राघुदीप भवानी पांडा (३५) असे मृताचे नाव आहे. कर्मचाऱ्यांसह ते रिसार्ट मधील पाण्याची टँक साफ करून पाणी काढण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी पाण्याच्या टँकमध्ये उतरले. कर्मचाऱ्यांना बटण चालू बंद करण्यास सांगितले. बटण चालू करताच त्या मोटारपंपाला विद्युत करंट असल्याने पांडा यांना जोरदार झटका लागला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोटारपंपाचा प्रवाह बंद केला.

मात्र त्रिफेज वीज प्रवाह असल्याने पांडा खाली कोसळले. कर्मचाऱ्यांनी त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरु आहे.