KPCL अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास,  खाणीचे उत्खनन बंद पाडू- हंसराज अहीर यांचा इशारा

0
153
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविता जिल्हा प्रशासनाने कंपनीला परवानगी दिली.

त्यामुळे केपीसीएलचे अधिकारी निर्ढावले असल्याची संतप्त भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे. केपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी यापुढे बैठकीस येण्यास टाळाटाळ केल्यास खाणीचे उत्खनन बंद पाडु असा इशारा बैठकीत अहीर यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वसुचनेनूसार दि 15 मार्च रोजी कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी मधील प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासंबंधात केपीसिएलच्या प्रबंधकीय संचालक व संबंधीत अन्य अधिकाऱ्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या लेखी सुचना दिल्या असतांना प्रशासनाच्या या आदेशाला या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. एकंदरीत केपीसिएलचे अधिकारी प्रशासनास जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रकल्पग्रस्तांचे, कामगारांचे प्रलंबित प्रश्न थकीत वेतन दिला नसतांनाही प्रकल्पग्रस्तांच्या पोटावर लाथ मारून कर्नाटक सरकारच्या या प्रकल्पाला कोळसा उत्खणणाची परवानगी दिली जाते हे दुदैव आहे. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दि. 19 मार्च रोजी पुन्हा बैठक लावण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

या बैठकीस केपीसीएलचा अधिकारी वर्ग उपस्थित झाला नाही तर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या हितासाठी प्रशासनाने परवानगी रद्द करण्याचे धाडस दाखवावे. आपल्या हक्कासाठी प्रकल्पग्रस्त व कामगार पुढील लढ्यास सज्ज राहील व खाणीतील उत्खणन बंद पाडेल असा सज्जड इशारा हंसराज अहीर यांनी या बैठकीच्या पाश्र्वभुमीवर दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस भद्रावती पं.स. चे सभापती प्रविन ठेंगने, नरेंद्र जिवतोडे, संजय ढाकने, नगरसेवक प्रशांत डाखरे व प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.