◆चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची टीका
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेअंतर्गत मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक आमसभांमध्ये या विषयावरून मोठे वादंग उठले आहे. नगरविकास मंत्रालयाकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मनपातील सत्ताधा-यांच्या मनमानी कारभाराने चंद्रपूरकर जनता कंटाळली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पराभव दिसत आहे. या नैराश्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या विरोधातील तक्रार करण्यात आल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर शहरातील जनतेला पारदर्शक कारभाराची स्वप्ने दाखवीत भाजप महानगरपालिकेत सत्तेत आली. त्यानंतर भाजप सत्ताधा-ऱ्यांनी मागील चार
वर्षांत कचरा निविदा प्रक्रिया, अमृत योजना, आझाद बगीचा नूतनीकरण, कोरोना रुग्णांना भोजन वाटप, प्रसिद्धी कंत्राट सर्व कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आहेत. एवढेच नाही तर २०० कोटींच्या कामात लेखापरीक्षणात आक्षेप घेण्यात आले आहेत.
एकंदरीत, आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांत झालेले आर्थिक अनियमिततेचे आरोप यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शकतेचा बुरखा फाटला आहे. त्यामुळे आगामी काळात होणा-ऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव दिसत असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली असल्याचेही रामू तिवारी यांनी म्हटले आहे.