पाणीपुरीतून विषबाधा : मुलीचा मृत्यू ७० जणांना बाधा ; गावात आरोग्य शिबिर – दूषित पाण्याचेही कारण

0
704
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भंडारा : पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा होऊन एका १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा चौरास या गावात मंगळवारी घडली. पाणीपुरीतून विषबाधेचे कारण सांगितले जात असले तरी गावातील दूषित पाण्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

भेंडाळा चौरास येथील गावकºयांनी रविवारी पाणीपुरी खाल्ली होती. सोमवारपासून त्यांना हगवण, उलटी आणि तापाचे लक्षणे दिसून येत होते. त्यातील काही जणांनी पवनी येथे जाऊन तपासणी करुन घरी परतले. सुमारे ७० जणांना हा त्रास जाणवला होता. दरम्यान, मंगळवारी गावातील राखी रामदास सतीबावने (१२) या मुलीची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला सकाळी पवनी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळून जागे झालेल्या आरोग्य विभागाने तात्काळ गावात धाव घेतली. त्यावेळी अनेक गावकºयांना हगवण आणि उलटीचा त्रास असल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोग्य शिबिर लावून गावकºयांची तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांना पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

तथापि, भेंडाळा येथील घटनेतील व्यक्तींची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभाग याबाबतची काळजी घेत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी तातडीने आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले आहे. पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी भेंडाळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पाणी पुरी स्टॉलचे नमुने घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

पाण्यात आढळले जंतू
भेंडाळा येथील विषबाधेची घटना पाणीपुरी खाल्ल्याने घडल्याचे सांगितले जात असले तरी गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोपही गावकºयांनी केला आहे. गावकºयांच्या घरात येणाºया पाण्यात अनेक दिवसांपासून जंतू आढळत आहेत. त्यामुळे दूषित पाणीपुरवठाही या घटनेला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गावातील पाईपलाईन खराब झाल्यामुळे भेंडाळा येथे दर पाच वर्षांनी गॅस्ट्रोसारखे आजार बळावतात, असेही गावकºयांचे म्हणणे आहे.