• कोरोना योद्धयाच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागात खळबळ
चंद्रपूर : भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत दिनेश बिनकर या कोरोना योद्धयाचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाशी झुंज देतांना उपचारादरम्यान काल शनिवारी ( 17 एप्रिल) सायंकाळी मृत्यू झाला. परिचराच्या मृत्युमुळे भिसी गाव शोकाकुल झाले असून स्थानिक आरोग्य विभागातही खळबळ उडाली आहे.
दिनेश बिनकर यांचं मूळ गाव भिसीपासून १४ किमी अंतरावरील शंकरपूर आहे.मागील तीन-चार वर्षांपासून ते भिसी प्रा.आ.केंद्रात परिचर पदावर कार्यरत होते. कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्तही ते रुग्णांना आपुलकीने सेवा देत होते. मागील वर्षभरापासून कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या दिनेशच्या आईचे निधन दीड महिन्यापूर्वी झाले.
भिसी येथे कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली. रुग्णांची सेवा करतांनाच सदर परिचराला ही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारार्थ नागपूर मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. मागील सहा दिवसात त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. पण काल १७ एप्रिल ला अचानक त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आणि सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. भिसी प्रा. आ. केंद्रातील दुसरा परिचरसुद्धा कोरोनाबाधित आहे.