प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून दोन प्राचार्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

चंद्रपूर : बल्लारपूर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेत कार्यरत आरोपी प्राचार्या विरूध्द अखेर बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेत कार्यरत प्राध्यापिकेकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. विनयभंग प्रकरणी या प्राचार्या विरुध्द केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 354, 354 अ, 354 अ (1)(आय), 354 ब, 354 ड, 506, 509, 323 अन्वये गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्रीकांत गोजे यांचा समावेश आहे. या दोघांविरोधात प्राध्यापिकेच्या तक्रारीनुसार, शारीरिक सुखाची मागणी करणे, छेडखानी करणे, प्रताडित व अपमानित करणे, भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करणे, मानसिक त्रास देणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी गंभीर आरोपांसह एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्राध्यापिकेने दोन्ही प्राचार्यांच्याविरूध्द दोन दिवसापूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. महाविद्यालयातील माझ्या कक्षात कार्यरत असताना या दोन्ही प्राचार्यांनी तेथे प्रवेश करून माझ्यासोबत अनुचित व्यवहार केला. जोरात आवाज चढवला, हाथ पकडला व कपडे ओढले, असा आरोप त्या प्राध्यापिकेने लावला आहे. या घटनेची तक्रार त्यांनी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी त्या घटनेला गंभीरतेने घेतले नसल्याने शेवटी पोलिस ठाण्यात तक्रार करावी लागली, असे तक्रारीत नमुद आहे.

महिला प्राध्यापिकेच्या म्हणण्यानूसार, या घटनेची तक्रार तिने प्रारंभी बल्लारपूर पोलिस ठाण्यात केली होती. मात्र तेथे तिच्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. उलट पोलिस अधिकार्‍यांनी आरोपींनाच चहा पाजला. आपल्या तक्रारीत प्राध्यापिकेने असेही म्हटले आहे की, जेव्हापासून पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून दोन्ही प्राचार्य तिच्या मागे लागले असून, तिला फोनवरून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. अखेर या प्राध्यापिकेच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बल्लारपूर पोलिसांना या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. वृत्तलिहेपर्यंत दोन्ही प्राचार्यांना अटक करण्यात आली नव्हती.

दरम्यान, बीआईटीमध्ये सुरू असलेल्या अशा घटनेमुळे काही पक्ष कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास महाविद्यालयात जाऊन दोन्ही प्राचार्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते दोघे तेथे उपस्थित नव्हते.

संस्थेच्या कर्मचार्‍यांची सारती संघटनेविरूध्द तक्रार
– तर संघर्ष केल्याने सारतीची बदनामी केल्याचे प्रतिउत्तर

बीआईटी संस्थेेचे प्राध्यापक तथा कर्मचार्‍यांनी सारती संघटनेच्या विरोधात संस्थेची बदनामी करण्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली आहे. त्या प्राध्यापिकेला भडकवून तिच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करवून घेण्यात या संघटनेचा हात असून, या मागे संस्थेला बदनाम करण्याचा संघटनेचा हेतू असल्याचा आरोप संस्थेच्या कर्मचार्‍यांनी केला आहे. तर, सारती संघटना कर्मचार्‍यांच्या व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत असल्याने त्यांच्याविरूध्द बोलले जात असल्याचे प्रसिध्दीपत्रक सारती संस्थेने काढले आहे.