ना. छगन भुजबळांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

भिवापूरच्या बसस्थानकावर अचानक शिवभोजन केंद्राला दिली भेट

चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल येथे जातांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आज भिवापूर बसस्थानक परिसरात थांबला. येथे पोहचताच भुजबळ थेट लगतच्याच शिवभोजन केंद्रात शिरले आणि केंद्राअंतर्गत सोयी सुविधांची माहिती घेत, शिवभोजनाचा स्वाद घेतला.

गोरगरीब गरजूंना केवळ १० रूपयांत मिळणारे भोजन खरंच चविष्ट आणि गुणवत्ता प्राप्त आहे का याची चाचपणी त्यांनी यावेळी केली. भुजबळ आज नागपूर येथून उमरेड-भिवापूर मार्गे चंद्रपूरला जाण्याकरिता निघाले होते. या दरम्यान भिवापूर येथील शिवभोजन केंद्राला भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाला व पक्ष पदाधिका-यांना होती. दरम्यान भुजबळ यांनी वक्रतुंड शिवभोजन केंद्राला भेट देत, केंद्र चालक शिरीष गुप्ता यांच्याशी संवाद साधला. सोयी सुविधांची पाहणीही केली.

नागरिकांना मिळणारे भोजन स्वादीष्ट व गुणवत्ता प्राप्त आहे का? याची चापणी करण्याकरीता भुजबळ यांनी स्वत: शिवभोजनाचा स्वाद घेतला. यात पाटोडीची भाजी, वरण, भात आणि पोळीचा समावेश होता. आ. राजू पारवे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदिप निंबार्ते, तहसीलदार अनिरूध्द कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आदी उपस्थित होते. पुढे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छगन भुजबळ यांचा राष्ट्रीयमार्गावरच सत्कारही करण्यात आला.